औंध येथील इंदिरा गांधी शाळेसाठी नगरसेविका अर्चना मुसळे यांचा पाठपुरावा
औंध – औंध येथील कलमाडी शाळेने गेल्या 17 वर्षांपासून कुठलाही करार नसताना, कायदेशीररित्या कुठलीही परवानगी नसताना पुणे महापालिकेच्या इंदिरा गांधी शाळेचे दोन मजले, टेरेससह अंदाजे दहा हजार चौरस फूट जागा ताब्यात ठेवली होती. याबाबत नगरसेविका अर्चना मुसळे यांच्यासह महानगरपालिकेला न्यायालयीन लढाईत यश आले असून या शाळेला आता हक्काची जागा मिळाली आहे.
औंध येथील शाळेच्या जागेवर कलमाडी शाळेचा ताबा असल्याने जागे अभावी महापालिकेच्या इंदिरा गांधी शाळेतील निम्मे विद्यार्थी बाकावर बसायचे तर निम्मे विद्यार्थी त्यांच्या पायाजवळ खाली जमिनीवर बसायचे. याबाबत ऍड. मधुकर मुसळे व नगरसेविका अर्चना मुसळे यांनी आयुक्तांकडे तक्रार करून जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला होता. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देत पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभांमध्ये नगरसेविका अर्चना मुसळे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. त्यानंतर या शाळेच्या 11 पैकी 7 खोल्या प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या.
परंतु, तांत्रिक मुद्यांच्या आधारे ही शाळा याविरुद्ध उच्च न्यायालयात गेली. ऍड. मधुकर मुसळे व अर्चना मुसळे यांनी महापालिकेच्या कायदे विभागाच्या वकिलांसह स्वखर्चातून या शाळेच्या पालकांच्यावतीने खासगी वकील सुद्धा उच्च न्यायालयात उभे करून, या संस्थेच्या ताब्यातून 11 खोल्या व त्यावरील टेरेस असे एकूण दहा हजार चौरस फूट बांधकाम अखेर ताब्यात घेतले त्याच बरोबर या शाळेकडून बेकायदेशीरपणे जागा वापरल्याबद्दल 65 लाख रुपये वसूल केले, गेली तीन वर्ष हा लढा चालू होता.
महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जागा नसल्यामुळे पटसंख्येच्या निम्मे विद्यार्थी बाकड्यावर तर निम्मे विद्यार्थी त्यांच्या पायाजवळ जमिनीवर बसत होते, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम आम्ही केले. मनपाची ही शाळा पुणे शहरात उत्कृष्ट शाळा म्हणून उदयाला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– अर्चना मधुकर मुसळे, नगरसेविका