पुणे – शहरातील हवा आणि पर्यावरण चांगले राहण्यात वृक्षांची संख्या आणि उद्याने महत्त्वाची भूमिका बजावत असतात, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पुण्याची “ग्रीन सिटी’ ही ओळख अधिक ठळक करण्यासाठी टेकड्यांवरील वृक्षलागवडीसाठी 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शहरातील उद्यानांचा विकास, सुधारणा व देखभालीवर महापालिकेचा भर आहे.
पर्वती, भांबुर्डा, वारजे आणि धानोरी येथील 1,800 एकरांहून अधिक वनक्षेत्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या साहाय्याने पुणे महापालिकेतील “संयुक्त वन व्यवस्थापन समिती’द्वारे येथील टेकड्यांवरील वृक्षांचे संवर्धन केले जाते. याअंतर्गत वारजे येथील 50, तर महंमदवाडी येथील 45 एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील पडीक जमिनींची माहितीही एकत्रित करण्यात आली आहे. त्यापैकी किती जमिनींवर छोटी वनक्षेत्रे तयार करता येतील, याची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, तसेच पर्यावरणप्रेमींची मदत घेतली गेली आहे.
टेकड्यांवरील वनक्षेत्र संवर्धनासह शहरातील हरित क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ न देता त्यात वाढच होईल, या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागातील सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून येथील 32 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचेही महापालिकेचे नियोजन आहे.
देशातील सर्वाधिक उद्यानांचे शहर म्हणून लौकिक असलेल्या बेंगळुरूच्या तुलनेत पुण्यातील उद्यानांखालील क्षेत्र 60 टक्क्यांहून अधिक आहे. बृहत् बेंगळुरु महापालिकेच्या आकडेवारीनुसार, एकूण 706 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या बेंगळुरू शहरात जवळपास 40 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर 1,020 उद्याने आहेत, तर पुणे महापालिकेच्या 332 चौरस किलोमीटर हद्दीत (नव्याने समाविष्ट 23 गावे वगळता) जवळपास 25 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर 204 उद्याने आहेत.
नागरी पर्यावरणाबाबत दक्ष असलेल्या पुणे शहराचा नियमित वृक्षगणना करणाऱ्या देशातील मोजक्या शहरांत समावेश होतो. “जीपीएस’ प्रणालीच्या साहाय्याने दरवर्षी पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वृक्षगणना करण्यात येते. गेल्या पाच वर्षांच्या वृक्षगणनेचा अभ्यास केल्यास या कालावधीत शहरातील वृक्षसंख्येत साडेआठ लाखांची वाढ झाल्याचे आढळून येते.
2020-21 च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार शहरातील वृक्षांची संख्या 47 लाख 13 हजारांवर पोहोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती 1.39 वृक्ष एवढे आहे. महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील वृक्षांची गणना यात झालेली नाही.