मांजरी – समाविष्ट ११ गावांमधील मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने मांजरी बुद्रुक येथे मैला वाहिनीचे काम सुरू केले आहे. हे काम आराखडा तयार करून न करता मनमानी पध्दतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कोणत्याही प्रकारची कल्पना न देता महापालिका अधिकारी व ठेकेदार संगनमताने केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार काम होत आहे. असा आरोप भापकरमळा येथील शेतकरी विश्वास भापकर यांनी केला आहे.
पुणे महानगर पालिकेच्या वतीने ११ गावांमध्ये १६७ किलोमीटर लांबीची मैलावाहिनी टाकणे, मांजरी बुद्रूक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणे या प्रकल्पा अंतर्गत सध्या मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठानदी ते कालवा दरम्यानच्या चार ते पाच किलोमीटर अंतराच्या मैला वाहिनीचे काम सुरू आहे.
भापकरमळा येथे काम करत असताना ही वाहिनी काही शेतकऱ्यांच्या खासगी जागेतून जात आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नसल्याचे शेतकरी विश्वास भापकर यांचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रकारची कल्पना न देता हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे महापालिकेने आधी कामाचा आराखडा जाहीर करावा आणि त्यानुसार काम करावे,तसे काम करण्यास विरोध नसल्याचेही भापकर यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत महापालिकेचे उपअभियंता विनायक शिंदे तसेच शाखा अभियंता गणेश पुरम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुळा- मुठा नदी ते कालवा अश्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर या चार फूट व्यासाच्या मैला वाहिनीचे काम सध्या भापकर मळा येथे सुरू आहे. काम शासकीय जागेतून रस्त्याच्या कडेने करण्यात येत आहे. शेजारील शेतकऱ्यांना तशी तोंडी कल्पना देण्यात आली असून आज त्याबाबत पत्रही देण्यात येणार आहे. मैला वाहिनीचे काम नियमानुसार होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही.