डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांचीही करणार भर्ती
पुणे – महापालिकेकडून शहरातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालिकेकडून आणखी 8 रुग्णालयात नवीन लसीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी जागा पाहणी सुरू करण्यात आली असून पुढील आठवड्यात ही केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, लसीकरणासोबतच शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडाही वाढत असल्याने महापालिकेस डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे तातडीने सहा महिन्यांसाठी डॉक्टर तसेच नर्सेसची भर्ती करण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अग्रवाल म्हणाल्या की, पालिकेची 58 लसीकरण केंद्र असून 51 खासगी दवाखान्यांची केंद्र आहेत. त्यात, वाढ करण्यासाठी महापालिकेकडून 25 बेड असलेल्या खासगी रुग्णालयांनाही लसीकरण केंद्रासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता
शहरात लसीकरणाने वेग घेतलेला असतानाच करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा 3 हजारांच्यावर गेला आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुन्हा बंद असलेली कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली असून त्यासाठी पालिकेचे दवाखाने बंद करून मनुष्यबळ कोविड सेंटरसाठी पाठवले आहे. तर, आता लसीकरण केंद्र सुरू करायची असल्यास पालिकेस डॉक्टर, नर्सेस, ऑपरेटर अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधी हे कर्मचारी तातडीने भरण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.