प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -प्रदूषण नियंत्रण महामंडळाने गणेशोत्सवात पीओपी मूर्ती विक्रीस बंदी घातली आहे. मात्र, या बंदीची अंमलबजावणी नेमकी कशी करायची हे अद्यापही महापालिकेने निश्चित केलेले नाही. त्यामुळे याची नियमावली करण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठक होणार आहे. अतिक्रमण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्री केल्या जातात. त्या रंगविण्यासाठी विषारी रंग वापरले जातात. हे रंग पाण्यात मिसळून जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे या वर्षीपासून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीला बंदी घालण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पालिकेस दोन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. मात्र, या निर्णयाची अंमलबाजावणी कशी करायची याबाबत अद्याप महापालिकेची कोणतीही नियमावली तयार झालेली नाही.
याबाबत महापालिकेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडेही पत्र पाठवून कारवाई कशा स्वरुपाची असावी, दंडात्मक तरतूद किती असावी, मूर्ती विक्री केली जात असल्याचे आढळल्यास गुन्हे कोणत्या स्वरुपाचे दाखल करावेत याबाबत मार्गदर्शन मागितले होते. मात्र, अद्यापपर्यंत पालिकेस कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. आता गणेशोत्सव तीन आठवड्यांवर आला असून गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉलही लागत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून अखेर याबाबत नियमावली करण्याचा निर्णय घेतला आहे.