पुणे- समाविष्ट 23 पैकी सूस, महाळुंगे, बावधन तसेच कोंढवे-धावडे या चार गावांचा कचरा उचलणे तसेच प्रक्रिया करण्यासाठी 3 कोटी 10 लाख रुपयांच्या निविदेस महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांनी सोमवारी मान्यता दिली. या गावांमध्ये कचरा संकलन तसेच प्रक्रियेची व्यवस्था नसल्याचे सांगत प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.
या खर्चात पुढील वर्षभरासाठीचा संकलन, वाहतूक तसेच प्रक्रियेचा खर्च समाविष्ट आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, ज्ञानेश्वर मोळक यावेळी उपस्थित होते. उर्वरित 19 गावांमध्ये कचरा संकलन व्यवस्था असून तो संकलित झाल्यानंतर महापालिका त्याची वाहतूक तसेच प्रक्रिया करत असल्याने या गावांसाठी या कामाची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. कुमार म्हणाले, 23 गावांमुळे महापालिकेचे दैनंदिन कचरा संकलन 1,800 वरून 2200 टनांपर्यंत गेले आहे. त्यातील या चार गावांत दररोज सुमारे 100 टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलन, वाहतूक तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे या कामासाठी निविदा काढयात आल्या होत्या.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रकल्पाही मदत
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका आर्थिक मदत करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यासाठी बोर्डाकडून जागा दिली जाणार असून, या प्रकल्पासाठीचे प्रक्रिया शुल्क तसेच कचरा वाहून नेण्यासाठीचे शुल्क देण्यात येणार आहे. त्याला यापूर्वीच मान्यता दिल्याचे कुमार म्हणाले.