पुणे : शहरात मागील तीन वर्षांत प्रशासक कालावधीत नागरिकांची दैनंदिन कामेही होत नसल्याचे चित्र असतानाच जादा कामामुळे व अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव वाढला आहे. या तणामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी मेंटल हेल्थ ॲप महापालिका खरेदी करणार आहे. या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार असून सीएसआर फंडातून सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून हे अॅप खरेदी केले जाणार आहे.
प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेच्या विविध विभागांमध्ये १७ ते १८ हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते.
महापालिका कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. यामध्ये आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन, योग आदी उपक्रमांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून मेंटल हेल्थ ॲप खरेदी करण्यात येणार आहे.