पुणे महापालिकेतील लेटलतीफ कर्मचारी-अधिकारी गेटबाहेर

अतिरिक्‍त आयुक्‍तांचा दणका : आता उशिरा येणाऱ्यांवर रोज कारवाई करणार

पुणे – महापालिकेच्या “लेट लतिफ’ कर्मचारी सोमवारी नेहमीप्रमाणे 10 वाजल्यानंतर मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोहोचले…परंतु सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद करून घेतले. आतमध्ये प्रवेश का मिळत नाही? याबद्दल सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली असता, “लेट लतिफां’वर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुमारे पाऊणतास या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. अखेर सकाळी 10.40 वाजता सर्व “लेट लतिफा’ंची नावे नोंदवून घेण्यात आली आणि त्यांना प्रवेशद्वाराच्या आत घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकावर “लेट मार्क’ लावण्यात येणार आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये दररोज शेकडो नागरिक कामासाठी येतात. अनेकजण खूप लांबून आलेले असतात. त्यात वयोवृद्धही असतात. सकाळपासूनच ही रेलचेल सुरू झालेली असते. परंतू, त्यांना संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी सकाळी वेळेत भेटतीलच याची शाश्वती नसते. अनेकदा विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी वेळेत कामावर उपस्थित झालेले असतात, परंतू कनिष्ठांचाच पत्ता नसतो. गेले काही दिवस महापालिकेतील अतिवरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळांवर लक्ष ठेवून होते. उशिरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून या लेट लतिफांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्‍तआयुक्त विपीन शर्मा यांनी दिले.

त्यानुसार सोमवारी सकाळी 10 वाजता महापालिकेमध्ये येणारे सर्व प्रवेशद्वार बंद करून घेण्याच्या सूचना सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सुरक्षारक्षकांना दिल्या. त्यानुसार सर्व प्रवेशद्वार तातडीने बंद करण्यात आले. 10 नंतर आलेल्या कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गेटवर आरडाओरडा सुरू झाला. पावणेअकरा वाजता हे प्रवेशद्वार उघडण्यात आले. प्रत्येकाचा विभाग आणि पूर्ण नाव लिहून घेण्यात आले. या यादीनुसार हजेरी पत्रकावर लेट मार्क लावण्यात येणार आहेत.

चहासाठीही कोणी बाहेर येईनात
“कोणीतरी आले आहे’ असे सांगत किंवा “चहा प्यायला जातो’ असे सांगून अनेकदा कर्मचारी चहा पिण्याच्या बहाण्याने महापालिका भवनाच्या बाहेर रेंगाळताना दिसतात. त्यानंतर ते थेट तासा-दोनतासानेच उगवतात. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा होतो. त्यावरही आता अंकुश लावण्यात आला असून, चहा पिणे तर सोडाच परंतु इमारतीत अन्य विभागात जायचे असेल तरी खातेप्रमुखांची परवानगी घेऊनच बाहेर जावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. याचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी झालेल्या कारवाईमुळे दिवसभरात चहा घ्यायला बाहेर जाणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

दररोज सकाळी 10 वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांना शिस्त लागण्यास मदत मिळेल. जे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत येतात त्यांच्यावर या बेशिस्तांमुळे अन्याय होतो. तो यापुढे होणार नाही सोमवारी सुमारे 215 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
– माधव जगताप, सुरक्षा विभाग प्रमुख तथा अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख

बायोमेट्रिकचा फज्जा
कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यावे यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आली होती. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. परंतू, कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आलेली ही यंत्रणाही बंद पडली आहे. ती सुरू करण्याबाबत उदासीनता आहे. परंतु यामुळेही “लेटलतिफ’ आणि सतत आपली खुर्ची सोडून भिंगरीसारख्या फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फावले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे काय?
मुख्य इमारतीमध्ये कारवाई करण्याला सुरूवात केली असली तरी “मिनी महापालिका’ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्येही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. क्षेत्रीय कार्यालयांमधील उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.