शीतल उगले यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढा

भाजप नगरसेवकांची मागणी : आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पुणे – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडील काही विभागांचा पदभार काढून घ्या, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा सज्जड दमच सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक कामांना परवानगी देत नसल्याने काही नगरसेवकांनी उगले यांच्याबाबत तक्रार करत पत्रकबाजीही केली होती. एवढेच नव्हे तर भाजपच्या काही नगरसेविकांनी महापालिका मुख्यसभेतच उगलेंविषयी थेट राग व्यक्त करत त्यांना परत पाठवा, अशी मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ही सुंदोपसुंदी थेट आयुक्तांना इशारा देण्यापर्यंत गेली. या सगळ्या तक्रारीवर महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती, ग्रेड पे तसेच भाजप नगरसेवकांच्या काही विषयांमध्ये उगले यांनी राज्यसरकारकडून अभिप्राय मागवत थेट नियमांवर बोट ठेवले आहे. याशिवाय अनेक करता न येणाऱ्या कामांमध्ये शेरे लिहून परवानग्या नाकारल्या आहेत. उगले यांच्या या भूमिकेमुळे नगरसेवकांची कामे अडली असून, नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांना करता येत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

विरोधी पक्षांकडून उगले यांची पाठराखण

या सगळ्या प्रकारात मात्र विरोधी पक्षांनी साहजिकच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत उगले यांची पाठराखण केली आहे. उगले यांना ठेवा किंवा बदली करा असे न सांगता सत्ताधाऱ्यांना प्रशासनाकडून कामच करून घेता येत नाही, त्यामुळे ते निष्क्रिय आहेत असा सूर विरोधी पक्षांनी लावला आहे. मुख्यसभेतही विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या भाषणांमध्ये याबाबत आरोप केले आहेत. या सगळ्या तक्रारीनंतर उगले यांची बदलीबाबत काही हालचाल होत नाही म्हटल्यावर त्यांच्याकडून काही विभागांचा कार्यभार काढून घ्या, अशी मागणी बुधवारी मुख्यसभा झाल्यानंतर भाजप नगरसेवकांनी आयुक्तांना भेटून केली. एवढेच नव्हे तर तसे केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावर आयुक्त सौरभ राव कोणता निर्णय घेणार याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)