खासदार चव्हाण यांची आयुक्तांकडे मागणी
पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा किंवा त्या भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घालत आहे. एका बाजूला शहरीकरण वाढत असताना अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेल्यास शहरासाठी ही अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचा ठरणार असल्याने या प्रशासनाने हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डिसी रूल) ऍमेनिटी स्पेसच्या जागांची विक्री करता येत नाही. तरीही महापालिकेने तसा प्रयत्न केल्यास पुणेकर म्हणून आमचा या निर्णयाला विरोध राहणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी या पत्रात नमूद केले आहे.
तसेच या जागांचा मास्टर प्लॅन करून गरजेनुसार, त्याचा आवश्यक त्या प्रयोजनासाठी विकास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.