लिलावातून पुणे पालिकेला 10 लाखांचा महसूल

पुणे – महापालिकेने जप्त केलेल्या अतिक्रमण साहित्याच्या लिलावातून पालिकेस सुमारे 10 लाखांचा महसूल मिळाला आहे. महापालिकेकडून ई-ऑक्‍शनद्वारे पहिल्यांदाच या साहित्याचा लिलाव करण्यात आला होता. या साहित्यात खराब हातगाडी, स्टॉल (लाकडी, लोखंडी), भंगार साहित्य, कटलरी, होजिअरी, खराब प्लॅस्टिक मटेरीयलचा समावेश होता.

महापालिकेकडून शहरात करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईत मोठ्या प्रमाणात माल जप्त केला जातो. व्यावसायिकांकडून दंड भरून हे साहित्य सोडविले जाते. मात्र, अनेक व्यावसायिक त्यानंतर हे साहित्य नेण्यासाठी येत नाहीत. असे साहित्य महापालिकेच्या गोडावूनमध्ये साठवून ठेवले जाते. अतिक्रमण विभागाने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत साठलेल्या साहित्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी 19 लॉट तयार करून त्याची मूळ किंमत 8 लाख 71 हजार रुपये ठेवण्यात आली होती. तर या साहित्याला लिलावात 10 लाख 33 हजार रुपयांची किंमत मिळाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.