टास्क फोर्सच्या सूचनांनुसार यंत्रणा उभारणी सुरू : अतिरिक्त आयुक्त अग्रवाल
जम्बो कोविड सेंटरसह अन्य ठिकाणी बेड, व्हेंटिलेटर यंत्रणा
पुणे – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता आहे. यावर आरोग्य यंत्रणा आणि उपचारासाठी महापालिकेने बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेली “टास्क फोर्स’ स्थापन केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार लहान मुलांवरील उपचारासाठी केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
लहानग्यांसाठी शिवाजीनगर येथील सीओईपी जम्बो कोविड सेंटरमध्ये 50 बेड, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात 200 बेड, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून लहान मुलांसाठीच्या खासगी रुग्णालये आणि तेथील डॉक्टर्सशी समन्वय राखून कामकाज सुरू केले आहे.
लहान मुलांवरील उपचार पद्धती, औषधे यांची उपलब्धता करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. जम्बो रुग्णालयामध्ये 5 बेडचे आयसीयू सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील 5 व्हेंटिलेटर्सचे सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार ऑक्सिजन मास्क आणि अन्य तांत्रिक बाबींची खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
राजीव गांधी रुग्णालयातही 15 व्हेंटिलेटर्सची सुविधा करण्यात येत आहे. “सीएसआर’ अथवा थेट खरेदी करुनही हे व्हेंटिलेटर्स तातडीने उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही अग्रवाल म्हणाल्या.