अधिकाऱ्यांची झाडाझडती!

11 गावांच्या कारभारावरून आयुक्‍तांनी घेतले फैलावर

पुणे – समाविष्ट 11 गावांमध्ये 9 महिन्यांनंतरही अजून पालिकेकडून काहीच कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे वारंवार तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या गावांमधील कामांसाठी नियोजन करून दिलेले असतानाही संबधित विभागाकडून काम का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाविष्ट गावांमध्ये आवश्‍यक मुलभूत सुविधा तातडीने कशा देता येतील, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या. गावांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी राव यांनी शुक्रवारी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

4 ऑक्‍टोबर 2017 मध्ये हद्दीजवळील 11 गावे पालिकेत समाविष्ट झाली. यानंतर गावांचे शासकीय दप्तर ताब्यात घेणे आणि कर वसुली करण्यापुढे पालिकेने इतर काहीच कामे केली नाहीत. या गावांची जबाबदारी पालिकेने या गावांलगतच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली आहे. मात्र, गेल्या 9 महिन्यांत फक्‍त घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या दोनच सुविधा या देता आल्या. त्यातही त्रुटी आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. या गावांमध्ये विकासकामे कशी सुरू आहेत, त्याचे पुढील नियोजन कसे असेल, याचा आढावा राव यांनी घेतला. त्यावेळी कोणत्याही अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यावर आयुक्‍तांनी नाराजी व्यक्त केली. या गावांमध्ये आवश्‍यक सेवा-सुविधा द्याव्यात, तेथे महापालिका काम करत आहे, याबाबत विश्‍वास निर्माण होण्यासाठी दृष्यस्वरूपातील सेवा तातडीने द्याव्यात, असे आदेशही राव यांनी.

मी तुमच्या पाठीशी

“विकासकामे होत नाहीत, म्हणून महापालिकेच्या सेवा बंद पाडण्याचा इशारा येथील नागरिक देत असून काम करू दिले जात नाही,’ असा मुद्दा या बैठकीत काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी राव यांनी “अशाप्रकारे पालिकेच्या कोणत्याही सेवेत अथवा कामात कोणी अडथळा केल्यास मी तुमच्या पाठीशी असून संबधितांवर कायदेशीरपणे कडक कारवाई केली जाईल,’ असे राव यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही गावांकडून अथवा ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास थेट आपल्याला कळवावे, असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.

11 गावांसाठी स्वतंत्र अधिकारी

या 11 गावांची विकासकामे, त्यांच्या बैठका तसेच आवश्‍यक कामांवर देखरेख आणि नियोजनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, या अधिकाऱ्याची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही राव यांनी सांगितले. सध्या या गावांसाठी महापालिकेने संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडेही या गावांची जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)