सलग दुसऱ्या दिवशी मुख्यसभा गाजली

मराठा आरक्षणासाठी सभा तहकुबी मांडूनही पुन्हा भाजपचीच कोंडी

महापौरांचा मानदंड पळविण्यावरून झटापट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशीही महापालिका मुख्यसभेत उमटले. बुधवारी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दिलेल्या सभा तहकुबीमुळे भाजपची राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे या सभा तहकुबीस पाठिंबा देऊनही सत्ताधारी भाजपची अडचण झाली. त्यामुळे गुरूवारच्या मुख्यसभेत भाजपनेच मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना समर्थन देत सभा तहकुबी मांडली. त्यावेळी विरोधकांनीही सभा तहकुबी दिली. त्यामुळे नेमकी कोणती सभा तहकुबी स्वीकारायची आणि यावर भाषणे करायची, की नाही यावरून भाजप आणि विरोधीपक्षांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहात अर्धा तास तणाव तसेच गोंधळाचे वातावरण झाले. त्यानंतर भाजपने सभा गुंडाळण्याचा प्रयत्न करताच विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांत महापौरांचा मानदंड पळविण्यावरून झटापट झाली.

राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. या मागणीस पाठिंबा देऊन त्यावर भाषणे करून द्यावीत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या सभा तहकुबीस भाजप पाठिंबा देत असली, तरी त्यावर भाषणे झाल्यास राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांवर सभागृहात राजकीय टीका करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत, त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. बुधवारी अशाच प्रकारे विरोधकांनी सभा तहकुबी मांडत भाजपला अडचणीत आणले. त्यामुळे भाजपनेही या तहकुबीवर स्वाक्षरी करत मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे दाखविले. मात्र, हा विषय संवेदनशील असल्याचे सांगत, त्यावर भाषणे करण्यास मानाई करत सभा गुंडाळण्यात आली.

त्यानंतर गुरूवारी या विषयावर चर्चा होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, सभा सुरू होताच पुन्हा विरोधकांकडून तहकुबी देण्यात आली. त्याच वेळी सत्ताधारी भाजपनेही आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री कृतिशील असून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्‍यक प्रक्रिया शासन करत आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ सभा तहकूब करावी, अशी तहकूबी मांडण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपने विरोधकांऐवजी भाजपचीच तहकुबी स्वीकारली. त्यामुळे विरोधक संतापले. त्यांनी नगरसचिवांना धारेवर धरत भाजपविरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नगरसेवकही आक्रमक होत त्यांनी महापौरांभोवती सुरक्षाकडे केले. दरम्यान, या गोंधळात विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सदस्यांनी तो पकडून ठेवला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी विरोधकांनी महापौरांसमोरील पाण्याचा ग्लास खाली फेकला. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी या गोंधळातच सलग दुसऱ्या दिवशीही सभा गुंडाळण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)