ओढ्यावर अतिक्रमणाची पुणे महापालिकेकडूनच ‘पायाभरणी’

आंबील ओढ्यालगतचे क्रीडा संकूल 17 वर्षांपासून बंद

– हर्षद कटारिया

बिबवेवाडी – महापालिकेकडूनच ओढे-नाल्यावर अतिक्रमणाची “पायाभरणी’ करण्यात आली असून सहकारनगर येथे 2003 मध्ये आंबील ओढ्यालगत अनधिकृतपणे क्रीडा संकुल बांधण्याचे “दिव्य’ पुणे महानगरपालिकेने केले. या अनधिकृत कामांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ही प्रक्रिया कागदोपत्रीच आहे.

कोट्यवधींचा खर्च करून बांधण्यात आलेले हे संकुल गेली 17 वर्षांपासून आजही बंदच आहे. महापालिकेकडून नाल्यांवर अतिक्रमण होत असल्याचे अनुकरण काही संस्था, राजकारणी, बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात आले. याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अशा अतिक्रमणांवर कारवाई करणेही आता पालिका प्रशासनालाच कठीण जावू लागले आहे. यातून “महापालिकेत ज्याची सत्ता, त्याचा ओढा’ अशी म्हणच आता प्रचलीत झाली आहे.

आंबील ओढ्याला पूर येवून झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील ओढ्यांवर तसेच ओढ्यांलगत झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दा समोर आला आहे. मुळातच अशा ओढ्यांवर अतिक्रमणाची सुरुवातच महानगरपालिकेकडूनच करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. महानगरपालिकेच्याच पावलावर पाऊल ठेवत अनेकांनी ओढ्यावर तसेच लगतच्या भागात अतिक्रमणं केली आहेत.

पालिकेकडून रोवण्यात आलेले “अतिक्रमण एरंडाचे बी’ एवढे फोफावले आहे की, आता पालिकेसाठीच ते विषारी ठरू लागले आहे. महानगरपालिकेत गेली कित्येक वर्षे ओढ्यावरील अतिक्रमणाचा विषय केवळ चर्चेसाठीच येत आहे. याच कालावधीत अनेक “माननियांनी’ याच ओढ्याच्या सफाईच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी “खर्च'(?) केला.

परंतु, अतिक्रमण मात्र निघाली नाहीत. ओढा रूंदीकरण, सुरक्षा, सिमा भिंती अशा कामावर मोठा निधी खर्च केलाच नाही. आज, शहरात अनेक अनावश्‍यक प्रकल्प वापराविना पडून आहेत. परंतु, नैसर्गिक ओढ्यांची सफाई, रूंदीकरण ही कामे रेंगाळलेलीच आहेत. यातूनच प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. आणि पुन्हा सवाल केला जातो, याला जबाबदार कोण?

आंबील ओढ्यामध्ये ज्या तलावामधून पाणी सोडले जाते त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे, तसे झाले तर ओढ्याला पूर येणारच नाही. ओढ्यालगत सिमाभिंत बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. परिसरात, अनेक प्रकल्प केले असून त्याचा फायदा झाला आहे. क्रीडा संकुल गेली 17 वर्षांपासून बंद असून ते सुरू होण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
– आबा बागुल, नगरसेवक, कॉंग्रेस


पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काही अनधिकृत बांधकामे असलेले प्रकल्प ओढ्यात केल्याने गेल्या दोन वर्षात आलेल्या पुराचा मोठा फटका बसला. सीमाभिंत बांधणे, नाला रुंदीकरण व नाल्यातून अतिरिक्त भराव काढण्यासाठी आग्रही पाठपुरावा आयुक्तांकडे करत आहे.
– महेश वाबळे, नगरसेवक, भाजप


सहकारनगर येथे ओढ्यावर बांधलेले क्रिडा संकुल 2003 पासून बंद आहे. याला चार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलेले आहे.
– विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते


मागील 20 ते 25 वर्षांपासून नगरसेवक म्हणून मिरवतात. तेच या गंभीर परिस्थितीस जबाबदार आहेत. इतका मोठा निधी खर्च करूनही मूलभूत प्रश्‍न तसेच राहिलेले आहेत.
– रुपेश तुरे, सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.