पुणे महापालिकेने मेट्रोसाठी दिल्या 410 कोटींच्या जागा

आतापर्यंत 19 ठिकाणांवरील सुमारे 14 ते 15 हेक्‍टर जागा हस्तांतरित

पुणे – मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल 410 कोटी रुपये मूल्य असलेल्या जागा महामेट्रोला दिल्या आहेत. आतापर्यंत पालिकेने महामेट्रोला 19 ठिकाणांवरील जागा हस्तांतरित केल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगाने होत असल्याचे सांगण्यात आले.

मेट्रो प्रकल्पात पुणे महापालिकेचा सुमारे 950 कोटी रुपयांचा हिस्सा असून या हिश्‍श्‍याच्या रकमेतून ही जागेची किंमत वजा केली जाणार आहे. दरम्यान, प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून देण्यात आलेली ही जागा असून त्या व्यतिरिक्त आणखी काही जागा महामेट्रोला लागणार आहे. वनाज ते रामवाडी हा संपूर्ण प्रकल्प पुणे महापालिकेच्या हद्दीतून जात असून स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या प्रकल्पाचा सुमारे साडेपाच किलोमीटरचा भाग पुणे हद्दीतून जात आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी कोथरूड डेपो येथील सुमारे 11 हेक्‍टर जागा तसेच स्वारगेट येथील मल्टिमॉडेल हबसाठी सुमारे अडीच हेक्‍टर जागा या दोन जागांसह इतर 19 ठिकाणांवरील लहान-मोठी जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात आली आहे.
या जागा महापालिकेकडून महामेट्रोला कायमस्वरूपी देण्यात आलेल्या असून त्या बदल्यात या जागांच्या किमतीपोटी महापालिकेने सुमारे 410 कोटी 12 लाख रुपयांचे मूल्यांकन निश्‍चित केले आहे.

महापालिकेच्या हिश्‍श्‍यातून मूल्य होणार वजा
या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी सुमारे 11 हजार 420 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात 50 टक्के निधी कर्जातून उभारला जाणार असून केंद्र व राज्यशासन प्रत्येकी 20 टक्के, तर दोन्ही महापालिका 10 टक्के खर्चाचा भार उचलणार आहेत. त्यात पुणे महापालिकेस 912 कोटी रुपयांचा खर्च द्यावा लागणार आहे. महापालिकेने दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यात जमिनींचे निश्‍चित होणारे हे शुल्क या 912 कोटी रुपयांमधून वजा केले जाणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठीचे महापालिकेकडून देण्यात येणारा 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जागेचा निधी पालिकेने दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यात आधीच महामेट्रोला गेला आहे. या शिवाय, भविष्यात मेट्रोकडून वनाज ते रामवाडी हा मार्ग आता नगर रस्त्याने सरळ न जाता कल्याणीनगरकडून वळविण्यात आल्याने त्या ठिकाणीही मेट्रोला महापालिकेच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे त्याचे शुल्कही या खर्चातून वजा होण्यास मदत होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here