चांदणी चौक उड्डाणपूल : भूसंपादनासाठी 180 कोटी द्या

काम रखडलेलेच: महापालिकेचे राज्यशासनाला साकडे

पुणे – चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उर्वरीत भूसंपादनासाठी महापालिकेस तब्बल 180 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. या भूसंपादनाचा मोबदला “टीडीआर’च्या माध्यमातून घेण्यास जागा मालक तयार नाहीत. त्यामुळे हे भूसंपादन रखडले आहे. उर्वारित भूसंपादनासाठी या निधीची मागणी केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा निधी मंजूर होताच, उर्वरित भूसंपादन 30 दिवसात पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) देण्यात आले असून त्यांना निविदा प्रक्रिया पूर्ण करून उपलब्ध जागेवर काम सुरू करण्याची सूचना केल्याचेही आयुक्‍त राव म्हणाले आहेत.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या चौकात दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. मात्र, त्याचे काम “एनएचएआय’कडून केले जाणार आहे. हे भूमिपूजन मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झाले. मात्र, त्यानंतरही या पुलासाठी आवश्‍यक जागा ताब्यात न आल्याने काम “एनएचएआय’ने सुरू केले नाही. पुलासाठी 13.92 हेक्‍टर भूसंपादन तसेच 67 सदनिका आणि दोन बंगले प्रभावित होणार आहेत. गेल्या वर्षभरापासून महापालिका या जागेचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अजूनही भूसंपादन करण्यास पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे भूमिपूजन होऊनही पुलाचे काम रखडलेले आहे. त्यावर 80 टक्के भूसंपादन केल्यानंतर कामाला सुरूवात केली जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान 56 टक्केच जागा ताब्यात आली असून उर्वरीत जागा मालकांनी रोख मोबदल्याची मागणी केली आहे. त्यासाठी तब्बल 180 कोटींची आवश्‍यकता आहे. मात्र, एवढा निधी देणे पालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे या निधीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)