पुणे – शहरात शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यंगतांना बंदी असताना महापालिकेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अखेर या गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले असून केवळ नियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांनाच पालिकेत प्रवेश दिला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. तसेच पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वारावरच रोखण्यात येत होते. महापालिकेत होणाऱ्या अनावश्यक गर्दीमुळे पालिका इमारत करोनाचा हॉटस्पॉट बनली असल्याचे वृत्त प्रभातने दिले होते. त्याची दखल घेत पालिकेकडून मुख्य इमारतीत प्रवेशाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
शहरात करोनाच्या साथीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे शासनाकडून कडक लॉकडाऊनचे आदेश काढतानाच शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागांच्या उपस्थितीवर बंधने घातली आहेत. याशिवाय, अभ्यागतांनाही महापालिकेत येण्यास मनाई करण्यात आली असून केवळ पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांनाच आत सोडले जात आहे.
मात्र, महापालिकेच्या ओळखीच्या कर्मचाऱ्याला बाहेर बोलवून तसेच राजकीय नेत्यांच्या नावाखाली अनेक जण महापालिकेत गर्दी करत आहेत. त्या ठेकेदारांचा तसेच कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे काही विभागात अनावश्यक गर्दी होत असून करोनाचा प्रसार महापालिकेतूनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.