कोंढवा – पुणे महानगरपालिका 2022च्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून तीनची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय आराखडे आखण्याला वेग आला आहे.
2017च्या पालिका निवडणुकीत कोंढव्यासह हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळविले होते, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने देखील महत्त्वाच्या ठिकाणी लक्षणीय विजय मिळविला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेला संमिश्र यश मिळाले. तर, कॉंग्रेसला एकही जागा मिळविता आली नव्हती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या जागा राखणे आणि वाढविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस या राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष इच्छुकांची संख्या यावेळी मोठी असणार आहे. आता, तीनचा प्रभाग झाल्याने सर्वच पक्षांचा उमेदवारी देताना कस लागणार आहे. यातूनच बंडखोर तसेच अपक्षांची संख्या वाढणार आहे. अधिकृत प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे तर्कवितर्कच्या आधारे निवडणुकीचे आराखडे आखण्यास सुरुवात केली आहे. साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून निवडून येण्याची तयारी अनेकांनी केलेली असताना गेल्यावेळी किरकोळ मतांनी पराभव झालेल्यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेण्याची तयारी ठेवली आहे.
प्रभाग रचनेत राजकारण?
महापालिकेच्या 2022च्या निवडणुकीत विजयासाठी तीनची प्रभाग रचनाच महत्त्वाची ठरणार आहे.2017च्या निवडणुकीत भाजपाने स्वतःच्या सोयीनुसार प्रभागरचना तयार करून विरोधी मातब्बरांचे प्रभाग तोडून त्यांना विजयासाठी झुंजायला लावले होते. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, अनेक नवखे व अनपेक्षितपणे सहज निवडून आले. आता, यावेळी तीनची प्रभाग रचना जाहीर झाल्याने महाविकास आघाडीने भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपाप्रमाणेच विरोधी मातब्बरांचे प्रभाग तोडण्याचे शस्त्र वापरल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपालाही झगडावे लागणार आहे.
अनेकांकडून “झेंडा विरहीत’ काम सुरू
प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता ज्या ठिकाणी राजकीय पक्षाला सक्षम उमेदवार नसेल तेथे आपली दावेदारी सांगण्यासाठी अनेकजण “वेट ऍन्ड वॉच’च्या भूमिकेत असून त्यांनी “झेंडा विरहीत’ काम सुरू केले आहे. पक्षाचा “लेबल’ नसेल तरी आपण पालिकेची निवडणूक जिंकणारच असा ठाम विश्वास असलेल्यांची संख्याही अधिक आहे. त्यातच 23 समाविष्ट गावांचा स्वतंत्र प्रभाग होणार, असे गृहीत धरून याबाबतही चाचपणी सुरू झाली आहे. समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने 2022ची पालिका निवडणूक भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. यामध्ये मनसे, आरपीआय तसेच आप या पक्षांची भूमिका देखील निर्णायक ठरू शकते.
मतदार म्हणतात…
करोना महामारीमुळे सर्वसामान्यांबरोबर सर्वच नागरिक हैराण झाले. या काळात ज्या नगरसेवकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी नागरिकांसाठी मोठ्या तळमळीने दवाखाना, धान्यवाटप, लॉकडाऊन काळात गावी जाण्यासाठी मदत, किराणावाटप, भाजीपाला वाटप, कोविड रुग्णांना बेड, इंजेक्शन मिळवून देण्यापासून ते जेवण देण्यापर्यंत हेतू विरहीत मदत केली आहे, त्या समाजसेवकांना जनतेचा मतदानरूपी आशीर्वाद नक्कीच मिळणार, अशा भावना जाणकारांसह ज्येष्ठ मंडळींनी बोलून दाखवल्या आहेत.
अंतर्गत गटबाजी घातक…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कात्रज, कोंढवा या भागात चांगले प्राबल्य असून हडपसरमध्ये देखील “मनसे’ची वोटबॅंक आहे. कोंढवा बुद्रुक भाजपाचा बालेकिल्ला असला तरी येथे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथे भाजपाला झुंजावे लागेल, अशी चर्चा आहे. कोंढवा खुर्दमध्ये मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक व एक मनसेचा नगरसेवक येथे निवडून आला आहे. कोंढवा खुर्दमध्ये शिवसेनेची मोठी ताकद असुनही अंतर्गत गटबाजीमुळे येथे शिवसेनाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मतभेद बाजूला ठेवावे लागतील.