पालिकेत भाजपची पुन्हा कोंडी

मराठा आरक्षण : सभा तहकुबीवरून सत्ताधाऱ्यांची अडचण

पुणे – मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरूवारी महापालिका मुख्यसभेतही उमटले. आंदोलनात दोघांचा मृत्यूू झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉग्रेस सदस्यांनी दिला. त्यामुळे प्रस्ताव फेटाळला, तर भाजपची अडचण होणार हे लक्षात घेऊन भाजप सदस्यांनी या तहकुबीस पाठिंबा दिला. मात्र, त्यावर भाषणे झाल्यास राज्य शासनावर टीकेची शक्‍यता लक्षात घेऊन सभा तहकुबी मंजूर करून विरोधी नगरसेवकांना बोलण्यास संधी न देता सभा गुंडाळली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी “एक मराठा, लाख मराठा’, “भाजप हमसे डरती है…’ अशा घोषणा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुलैची मुख्यसभा आणि पर्यावरण सद्यस्थिती अहवालाची खास सभा बुधवारी दुपारी 3 वाजता होती. पर्यावरण अहवाल दाखल करून घेतल्यानंतर जुलैची सभा सुरू होताच, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप यांच्यासह दिलीप बराटे यांनी “मराठा आरक्षण आंदोलन सुरू असून त्यात काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहतून ही सभा तहकूब करावी,’ अशी तहकुबी मांडली, सुरूवातीला भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सभा तहकुबीचा विषय लक्षात येताच भाजपची अडचण झाली. त्यामुळे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी महापौरांकडे धाव घेतली.

सभा तहकुबी फेटाळल्यास भाजपची अडचण होणार, हे निश्‍चित असल्याने भाजपने पवित्रा बदलत या सभा तहकुबीवर स्वाक्षरी केल्या. त्यास कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला. “ही सभा तहकुबी आधी देण्यात आली आहे. त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत. तसेच एकदा ती दिल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करता येणार नाहीत,’ असे सांगितले. मात्र, त्यानंतर भाजप सदस्यांनी महापौरांच्या आसनाजवळ या तहकुबीवर स्वाक्षरी केल्या. त्यानंतर ही सभा तहकुबी पुकारून मंजूर करण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षांनी “त्यावर आपल्याला भाषणे करायची आहेत,’ अशी भूमिका घेतली. मात्र, महापौरांनी सभा संपल्याचे सांगत ही सभा गुंडाळली. त्यामुळे विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्‍त करत महापौरांसमोरच घोषणाबाजी सुरू केली.

सभा तहकुबी आमच्याकडून देण्यात आली. त्यावर नंतर भाजपने स्वाक्षरी केल्या, ही बाब चुकीची आहे. तसेच तहकुबीनंतर सदस्यांनी मागणी केल्याने त्यांना भाषणास परवानगी देणे गरजेचे होते. मात्र, भाजपने त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे भाजपचा आरक्षणाबाबत स्वाक्षरी करणे म्हणजे केवळ दिखावा आहे. त्यांना यावर चर्चा नको आहे.
– अरविंद शिंदे, गटनेते, कॉंग्रेस.


आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील होता. श्रद्धांजलीसाठी मांडलेल्या सभा तहकुबीला भाजपचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्या. या मागणीवरून राजकारण तसेच चुकीच्या पद्धतीने आरोप केले जाऊ नयेत, म्हणून कोणाला बोलू देण्यात आले नाही.
– मुक्ता टिळक, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)