भामा-आसखेड प्रकल्पाचे काम पुन्हा बंद

बंदोबस्तात काम करण्यासाठी पालिकेचे पोलिसांना पत्र

पुणे – शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेडून सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम स्थानिक नागरिकांनी रविवारी पुन्हा बंद पाडले. त्यामुळे ते पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या भागात प्रतिबंधात्मक आदेश देत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने ग्रामीण पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, चाकण येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे तेथे बंदोबस्त असल्याने तातडीने व्यवस्था करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकी तर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पाग्रस्तांनी हे कात अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान आपल्या मागण्यांसाठी या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता पुन्हा रविवारपासून प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून काम बंद राहिल्यास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने पत्र पाठवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

चाकणच्या आंदोलनामुळे पोलिसांची असमर्थता

प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधत बंदोबस्त उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मात्र, चाकण येथे मराठा आंदोलनामध्ये जाळपोळ झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास बंदोबस्त उपलब्ध करणे शक्‍य नसल्याचे पालिकेस कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता पालिकेने सोमवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठविले असून शक्‍य तितक्‍या लवकर बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)