ऍन्टिजेन, आरटी-पीसीआर तपासणीकडे नागरिकांची पाठ
पुणे – करोनाची लक्षणे असलेले संशयित नागरिक खासगी लॅब तसेच महापालिकेच्या कोविड केअर सेंटर येथील रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट तसेच आरटी-पीसीआर चाचण्यांकडे पाठ फिरवत आहेत. तर, करोनाचे योग्य निदान होण्यासाठी एक्स-रे तपासणी तसेच सीटी स्कॅन करण्यावर भर देत असल्याचे समोर आले आहे.
एक्स-रे तपासणी, सीटी स्कॅन तपासणीनंतर अनेक संशयित नागरिक परस्परच घरी अथवा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांचे ट्रेसिंग कठीण होत आहे. त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी आता सीटी स्कॅनची सुविधा असलेल्या हॉस्पिटलला संशयिताचे स्कॅनिंग केल्यानंतर त्याची माहिती तातडीने पालिकेच्या आरोग्य विभागास कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांचे ट्रेसिंग करून त्यांच्यापासून होणारा करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
पालिकेच्या करोना चाचण्यांवर प्रश्नचिन्ह
महापालिकेकडून करोनाच्या चाचण्या मोफत केल्या जातात. तर खासगी लॅबमध्येही 1200 रुपयांमध्ये करोनाची चाचणी होते. मात्र, या चाचण्यांच्या वैधतेवरच रुग्णांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चाचण्यांचे अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील काही दिवसांत करोना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
तर, या अहवालावर विसंबून राहून अनेकांनी आजाराकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना गंभीर स्थितीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे संशयित रुगण् छातीचा एक्स रे आणि सीटी स्कॅन करण्यावर भर देत आहते. मात्र, त्यात ज्यांना करोना झाल्याचे निदर्शनास येत आहे, त्यांची माहिती महापालिकेस न देता परस्पर उपचार केले जात आहेत.