पुणे – महापालिका निवडणुकांपूर्वी मोठा गाजावाजा करत महापालिकेने शहरात 11 ठिकाणी बसमध्ये तयार केलेली महिलांसाठीची “ती’ स्वच्छतागृहे बंद पडली आहेत. त्यांचे काम घेण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने ती बंद आहेत. दिल्ली सरकारने केलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर महापालिकेनेही स्मार्ट सिटी अंतर्गत सीएसआरमधून पीएमपीच्या भंगारात काढलेल्या 11 बसमध्ये बदल करून ती उभारली होती.
महापालिकेने 2017 मध्ये या बसचे लोकार्पन केले. त्यानंतर 11 बसमध्ये ही सुविधा देण्यात आली, तर या बसचे स्वच्छता तसेच जबाबदारी घेण्यासाठी महापालिकेने निविदाही काढल्या. त्यामुळे या बसच्या स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पाच ते दहा रुपयांचे शुल्क निश्चित केले, तर संबंधीत बस चालविण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदारांना बसच्या बाहेरील बाजूस जाहीरात तसेच मागील बाजूस उभारलेल्या छोट्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ विक्रीची मुभा देण्यात आली. त्यानंतर या बस शहरात वर्दळीच्या ठिकणी उभ्या करण्यात येणार होत्या.
मात्र, ही अभिनव संकल्पना आपल्या प्रभागात दिसावी म्हणून अनेक नगरसेवकांनी या योजनेत घुसखोरी केली तसेच या बसेस आपल्या प्रभागात आणून लावल्या. मात्र, त्यासाठीची जागा निवडताना संबंधीत ठिकाणी महिलांची गर्दी असते का त्याचा वापर होतो का किंवा त्याची नियमित देखभाल होते का याकडे लक्ष देण्यात आले नाही. तर, त्यानंतर मागील वर्षभर लॉकडाऊनमध्ये या बसेस बंदच होत्या.
त्यानंतर आता या बसेसचे काम देण्यात आलेल्या संस्थेची निविदाही संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी या 11 बसमधील केवळ 1 ते दोनच बस सुरू असल्याचे प्रशासनाकडूनच सांगण्यात आले.