पुणे – शहराच्या विकासकामांबाबत मनपातील भाजप पदाधिकारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. या घटनेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, “आयुक्त आमच्यासमवेत नव्हते, मात्र त्यांची आणि आमची एकाच वेळी फडणवीस यांच्याशी योगायोगाने भेट झाली,’ असा दावा या दौऱ्यातील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शहरात भाजप पदाधिकाऱ्यांत गेल्या काही दिवसांत वाद सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुण्यात फडणवीस यांनी भाजप शहराध्यक्षांसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांची भेट घेत, वाद मिटविण्याच्या सूचना केल्या.
शिवाय, वाद सार्वजनिक होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावेळी एका पदाधिकाऱ्याने शहराच्या विकासकामांबाबत तसेच निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली होती.
त्यानुसार फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळची वेळ दिली होती. त्यानुसार हे तीनही पदाधिकारी मुंबईत गेले. मात्र, त्यांच्यासमवेत आयुक्तही फडणवीस यांच्या भेटीवेळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या उपस्थितीबाबत या बैठकीस असलेल्या एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
“काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात आले होते. त्याचवेळी आयुक्तांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यावेळी भेट न मिळाल्याने आयुक्तांनाही बुधवारी संध्याकाळची वेळ दिली होती. त्यामुळे आमची भेट एकाच वेळी झाली,’ असा दावा या पदाधिकाऱ्याने केला आहे.
मात्र, शहर विकासकामांचा आढावा देण्यासाठी तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यासाठी थेट आयुक्तच फडणवीस यांच्या भेटीला भाजप पदाधिकाऱ्यांसोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट अतिशय गोपनीय पद्धतीने झाल्याने जोरादार चर्चा सुरू आहे.