राजगुरूनगर -राजगुरूनगर येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरू आहे. सुरुवातील 100 तर आता 200 जणांना रोज लस देण्यात आहे. त्याची नोंदणी ऑनलाइन असल्याने पुणे-मुंबईसह इतर भागातील नागरिक ऑनलाइन लसीकरण करण्यासाठी राजगुरूनगर केंद्राची निवड करीत असून लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.
खेड तालुक्यात केंद्र असताना तालुक्यातील केवळ चार दिवसांत केवळ 21 जणांचे लसीकरण झाले आहे उर्ववरीत सर्व पुणे मुंबई येथील आहेत. शासनाकडून स्थानिकांना डावलण्यात येत आहे. स्थानिकांसाठी वेगळी नोंदणी ठेवावी आणि त्यासाठी लस उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील लस घेण्यासाठी आलेली 18 ते 44 वयोगातील सुशिक्षित नागरिक आहेत; मात्र लसीकरण केंद्रावर शासनाचे नियमांचे ते उल्लंघन करीत सोशल डिस्टन्स ठेवत नसल्याने करोना पसरण्याचा धोका वाढवत आहेत.
लसीकरण केंद्रावर जशी नोंदणी केली, त्यानुसार नावे गेटवर लावण्यात येतात मात्र शहरातून आलेल्या व्यक्ती लिस्ट नुसार न थांबता गर्दी करत असल्याने करोना विषाणू संक्रमण होण्याचा धोका आहे. दरम्यान, गर्दी कमी करण्यासाठी येथे पोलिसांची नियुक्ती केली आहे; मात्र पुणे-मुंबईवरून आलेल्यांकडून पोलिसांना उलटे बोल सुनावण्यात येत आहेत.
त्यातील काही नागरिक थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना फोन करून स्थानिक पोलिसांच्या तक्रारी करीत आहेत. लसीकरण करण्यासाठी आलेल्यांकडून सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून गर्दी हटविण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तालुक्यातील 18 ते 44 वयोगातील नागरिकांना लस देण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेत बदल करावा तसे झाले नाहीत तर लसीकरण करण्यासाठी बाहेरगावहून येणाऱ्यांना रोखण्यात येईल आणि मोठे आंदोलन केले जाईल.
– अंकुश राक्षे,
माजी सभापती, पंचायत समिती, खेड तालुका
लसीकरण करण्यासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे. करोनाचे नियम पाळावेत. सोशल डिस्टन्स ठेवावा. येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांबरोबर हुज्जत घालू नये. गर्दी करणाऱ्या, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व पोलिसांबरोबर हुज्जत घालणाऱ्यावर कारवाई केली जाईल.
– सतीश गुरव, पोलीस निरीक्षक, खेड
तुम्ही पुण्यात शॉपिंगला आलेले चालते का?
सध्या करोनाचे संक्रमण तिव्र गतीने सुरू आहे. स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने स्थानिक नागरिक पुणेकरांना राजगुरूनगर येथे लसीकरणास येऊ नका असा सल्ला देताच पुणेकर तुम्ही शॉपिंगला पुण्यात आलेले चालते का असा उलट सवाल करत आहेत.