पुणे-मुंबई महामार्ग असुरक्षित

स्थानिक टोळ्या सक्रिय : “वाटमारी’च्या घटना वाढल्या

मावळ – पुणे-मुंबई महामार्गांवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यात अडवून लुटण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात चोरी आणि वाहनचालकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. या टोळ्या ट्रकचालकांना लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे पुणे ते मुंबईचा रात्रीचा प्रवास सुरक्षित राहिलेला नाही, ही बाब अधोरेखित झाली आहे. “वाटमारी’ रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी महामार्गावर रात्रगस्त वाढविण्यात यावी, अशी मतप्रवाह दिसून येत आहे.

नाकेबंदी अन्‌ रात्रगस्त वाढविली
लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी महामार्ग आणि स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळी नाकाबंदी, गस्त वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महामार्गावर रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी मालवाहू वाहनांचा वेग कमी झाल्यानंतर मोटार, दुचाकी आडवी लावून वाहने थांबविण्यात येतात. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून चालकांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रत्येकवेळी पोलिसांत तक्रारी दाखल होतातच असे नाही, बऱ्याचदा वाहन चालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. महामार्गावर अन्य गुन्हे करणाऱ्या परप्रांतीय टोळ्यांबरोबर स्थानिक टोळ्याही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतील, असा संशयही बळावला आहे.

मावळ तालुक्‍यातून पुणे-मुंबई द्रुतगती आणि महामार्ग गेलेला आहे. याशिवाय रेल्वे प्रवासही दिसतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. परराज्यातील ट्रकचालक, दुचाकीस्वार, मोटार अडवून त्यातील प्रवाशांना लुटण्यात येत आहे. त्यात परराज्यातील ट्रकचालकांना लुटण्याचे, रात्रीच्या वेळी त्यांच्या ट्रकमधील डिझेल चोरी यांसारखे गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

आठवड्यापूर्वी चोरीच्या दुचाकी घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनाला आलेल्या सात जणांची टोळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली. यामध्ये चोरीच्या तीन दुचाकी घेऊन आलेल्या सात जणांपैकी तिघे अल्पवयीन निघाल्याची बाब उजेडात आली आहे. याशिवाय या आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

याशिवाय शनिवारी (दि. 22) भल्या पहाटे पुणे-मुंबई महार्गावर मालवाहू ट्रेलर बंद पडल्याने चालक केबीनमध्ये झोपला होता. त्यावेळी तिघांनी चालकाला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्‍कम हिसकावून धूम ठोकली. मात्र या घटनेची पोलिसांना तात्काळ खबर लागली, यामध्ये पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून जेरबंद केले.

आठवड्याभरातील या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वाहनचालकांना लुटणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांनी गजाआड केल्या आहेत. वाढत्या गुन्ह्यांमुळे रात्रीच्या वेळी महामार्गावरील प्रवास असुरक्षित होत आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील लुटमार करणाऱ्या काही टोळ्यांना पोलिसांनी वेसण घातली आहे. काही टोळ्या सक्रीय असून, त्या पकडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या घटना रोखण्यासाठी महामार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे, असे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.