पुणे-मुंबई महामार्गालगत कचऱ्याचे ढीग!

विद्रुपीकरण वाढले : कचऱ्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

सोमाटणे – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजूस कचऱ्याचा विळखा बसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मावळ तालुक्‍यात या कचऱ्याच्या तीव्र दुर्गंधीयुक्‍त वासामुळे वाहनचालक, प्रवासी व पादचारी त्रस्त झाले आहेत. कचऱ्याच्या ढिगामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण झाले आहे. मुख्यतः ओढे आणि नाले असलेल्या ठिकाणी कचरा अधिक आहे.

सोमाटणे टोल नाक्‍याजवळील महामार्गालगतच्या ओढ्यावरील पुलालगत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, थर्माकोल, हॉटेलमधील दूषित अन्न व कचरा, सडलेल्या भाज्या, मैला, रासायनिक तसेच घरातील कचरा व मटणाच्या दुकानातील खराब मटण, सडलेली अंडी, कोंबडीचे पंख आदी पदार्थ टाकले जातात. या कचरा कुजल्याने त्याचा तीव्र दुर्गंधीयुक्‍त वास येत आहे.

पावसाळ्यात या ओढ्याला पाणी आल्यावर ही दुर्गंधी पाण्याबरोबर नदीत वाहून जाते आणि नदीचे पाणी देखील दूषित केले जाते. या साचलेल्या कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, डुकरे, कावळे, जनावरे आदी गर्दी करतात. यातून मिळेल ते पदार्थ तोंडात घेवून पळ काढतात. अनेक प्राणी महामार्गावरील वाहनांना धडक देतात.त्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

वाऱ्यामुळे या कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या पिशव्या महामार्गावर तसेच महामार्गालगत ठिकठिकाणी साचल्याने महामार्गाचे विद्रुपीकरण झाले आहे. काही वेळा हा कचरा स्थानिक नागरिकांकडून जाळला जात असल्याने धुरामुळे परिसरातील नागरिकांचे तसेच वाहनचालकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. असे चित्र मावळ तालुक्‍यातील देहुरोड ते लोणावळ्यापर्यंतच्या महामार्गालगत दिसून येत आहे.

पुणे-मुंबई महामार्ग आर.बी.आय. या कंपनीकडे देखरेखेसाठी असून, या महामार्गावर आरबीआयकडून टोल वसूल केला जात आहे. परंतु सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गालगत अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साचलेला कचरा तत्काळ उचलून या ठिकाणी कचरा टाकण्यावर निर्बंध घालावेत. पादचारी, वाहनचालक यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्ग सुशोभित करावा, अशी मागणी रहिवाशी, पादचारी व वाहनचालक यांच्याकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.