पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे आज पुन्हा बंद

दुपारी 12 ते 4 वेळेत ओव्हरहेड गॅन्ट्री बसविणार

पुणे – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर उद्या (दि. 22) ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावर दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, लग्नसराई आणि सुट्ट्या कालावधी लक्षात घेता यापुढील कालावधीत महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही, असे राज्य रस्ते सुधारणा महामंडळाच्या वतीने गेल्याच आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. मात्र, लगेचच हा निर्णय बदलल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

राज्य रस्ते सुधारणा महामंडळाच्या वतीने ही ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील “33.500′ पॉइंट याठिकाणी थांबविण्यात येणार आहे. हलकी चारचाकी आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने ही महामार्गावरील पर्यायी मार्ग म्हणून खालापूर टोलनाका येथून प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच जुन्या महामार्गावर वळविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनचालकांनी खालापूर टोलनाका, चौक फाटा, दांड फाटा, आंजिवली चौक, शेडुग फाटा येथून परत एक्‍स्प्रेस-वेवरुन मुंबईकडे अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा. सर्व प्रवासी आणि वाहनचालक यांनी या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.