पुण्याला आता ‘मुळशी’चे पाणी; 5 टीएमसी कोटा

विभागीय आयुक्तांनी बोलवली बैठक; पुण्याच्या हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

पुणे- शहराला मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी मिळावे, याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे बैठक होणार आहे. सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार असून त्यासाठी, महापालिका तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

 

 

महापालिकेच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबत सुतोवाच केले होते. त्यानंतर महापालिकेकडूनही विभागीय आयुक्तांकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, ही बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, प्राथमिक स्तरावरील ही बैठक असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

 

महापालिकेकडून शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच पालिकेची हद्दवाढ झाल्यास नव्याने समाविष्ट होणाऱ्या लोकसंख्येसाठी राज्यशासनाकडे 2012 पासूनच 18.50 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र. शासनाकडून अद्याप या वाढीव पाणी कोट्याबाबत निर्णय घेतलेला नाही. तसेच शहरासाठी केवळ 11.50 टीएमसीच पाणीसाठा मंजूर केलेला आहे. तर पालिकेस या वर्षापासून भामा-आसखेड धरणातूनही 2.67 टीएमसी पाणी मिळणार आहे. मात्र, त्यानंतरही शहरासाठी आणखी पाण्याची आवश्यकता असल्याने, भामा-आसखेड योजनेच्या उद्घटान प्रसंगी महापालिका पदाधिकाऱ्यांकडून पालिकेच्या पाण्यात भविष्यात कोणतीही कपात करू नये, तसेच शहरासाठी वाढीव पाणी द्यावे अशी मागणी करण्यात आली होती.

 

 

त्यावेळी, उपमुख्यमंत्री पवार यांनी आता शहरे वाढत असताना, मुळशी धरणातून टाटांनी वीजनिर्मिती थांबवावी आणि त्यातील पाणी पुण्याला मिळावे यासाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, महापालिकेतील विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना देत शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. तसेच काही नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.