पुणे – मुळा-मुठा नदीला मृतांची बाधा

मृतांचे कपडे, वस्तू टाकल्याने नदी मरणासन्न अवस्थेत

पुणे – “नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमींमधून टाकण्यात येणारे मृतांचे कपडे आणि वस्तू यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामुळे गाळ वाढून नदीचे अत्याधिक प्रदूषण होत असल्याचे नदी स्वच्छता मोहिमेतून समोर आले आहे. त्यामुळेच कधी काळी पुण्याची जीवनदायिनी अशी ओळख असणाऱ्या मुळा-मुठा नदीला मृतांची बाधा होत असल्याने नदी मरणासन्न अवस्थेत पोहचली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कुटुंबातील एका सदस्याला गमावणे ही अतिशय दुखाची बाब असते. त्यामुळेच त्या व्यक्‍तीच्या प्रत्येक वस्तूंमधून तिच्याबाबतच्या आठवणी जागृत होत राहतात. विशेषत: मृत व्यक्‍तीसाठी शेवटच्या क्षणातील अथवा अंतविधीच्या वेळी वापरण्यात आलेल्या वस्तूंचे नदीत विसर्जन करण्याची प्रथा आपल्या समाजात आहे. त्यानुसार शहरात अनेक ठिकाणी नदीकाठी स्मशानभूमी बांधण्यात आल्या असून या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांकडून अंत्यविधीच्या वेळी वापरण्यात येणारे कपडे, वस्तू या नदीत टाकल्या जातात.

शहरातील काही तरुणांनी एकत्र येत रविवारी वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील नदी पात्राची स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. या उपक्रमासाठी माहेर महिला प्रतिष्ठानने सहकार्य केले असून सुमारे 13 तरुणांनी या स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदविला होता. या उपक्रमात सार्थक म्हात्रे आणि त्याचे 12 मित्र सहभागी झाले होते. डॉक्‍टर, इंजिनिअर, सी.ए अशा विविध क्षेत्रांतून एकत्र येत या तरुणांनी सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत ही स्वच्छता मोहीम राबविली.

थेट नदीपात्रात उतरून गाळ काढण्याचा प्रयत्न करताना तरुणांना याठिकाणी मोठ्या प्रमाणात मयत व्यक्‍तींच्या वस्तू, कपडे आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आढळल्या. मातीत खोलवर रूतल्याने या पात्रातील गाळ काढण्यास खूप वेळ लागला असल्याचे सार्थक याने सांगितले.

दीड ट्रक कचरा गोळा
प्रतिष्ठानच्या विद्या म्हात्रे म्हणाल्या, “या स्वच्छता उपक्रमांतर्गत आम्ही सुमारे दीड ट्रक कचरा गोळा केला. यामध्ये सर्वाधिक समावेश हा कपड्यांचा होता. आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला गमावणे हे अतिशय दुखाचे असले तरी, त्यामुळे नदी दूषित होईल अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे हे अतिशय चुकीचे आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तसेच, स्मशानभूमीतून अशाप्रकारे वस्तू, कपडे बाहेर टाकले जाणार नाही यासाठी महापालिकेने सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही लवकरच महापालिका आयुक्‍तांची भेट घेणार आहोत.

9 आणि 16 जूनलाही होणार स्वच्छता
दत्तवाडी येथील नागझरी ओढ्यातून मोठ्या प्रमाणात नदीत मिसळणारे सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा आणि वस्तू यामुळे वैकुंठ स्मशानभूमीमागील नदीपात्राची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच या पात्राची स्वच्छता करण्यासाठी 9 आणि 16 जूनलाही स्वच्छता उपक्रम राबविणार असल्याचे विद्या म्हात्रे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.