पुणे- शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी “जायका’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या सोबतच दोन्ही नद्यांचे काठ विकसित करण्यासाठी नदीकाठ सुधारणा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यास 72 (ब) अंतर्गत मंगळवारी झालेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रकल्प राबविण्यासाठी 2,619 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या योजनेअंतर्गत संगम पूल ते येरवडापर्यंतच्या अंदाजे चार किलोमीटर अंतरासाठी अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीच्या सुमारे 44 किलोमीटर लांबीच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्याची पुणे महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मुळा-मुठा नद्या वाहतात. नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला होता.’
मुळा-मुठा नदीकाठ साबरमतीसारखाच व्हावा, या पुणेकरांच्या स्वप्नाला साकारण्याची सुरुवात लवकरच होत आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तर आजवरच्या टप्प्यात विविध पातळ्यांवर केलेल्या पाठपुराव्याला आलेले हे यश समाधानकारक आहे. पुणेकरांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे पुढचे टप्पेही वेगाने पूर्ण करण्याचा या “एसपीव्ही’चा अध्यक्ष म्हणून प्रयत्न असणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
अशी आहे योजना
या प्रकल्पासाठी नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, डिझाइन नकाशे तयार करणे, भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चित करणे, नदीच्या दोन्ही बाजूंच्या मिळकतींची मोजणी, सविस्तर प्रकल्प अहवाल आदी काम पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी 768 हेक्टर क्षेत्र लागणार आहे.
नदीच्या वहनासाठी 526 हेक्टर, नदीच्या मजबुतीकरणासाठी 180 हेक्टर आणि विविध सुविधा पुरविण्यासाठी 62 हेक्टर क्षेत्र लागणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता वाढणार आहे. पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविता येणार आहे. संपूर्ण नदीकाठ परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. नदीकाठची वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी उद्याने, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.