‘सुषमाजी तुम्ही या जगात नाही, ही बातमी पचवणं खूप अवघड’

पुणे : उत्तम वक्‍त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रात्रीच्या सुमारास त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने सर्वच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुषमाजी तुम्ही या जगात नाही, ही बातमी पचवणं खूप अवघड आहे. तुमच्याबरोबर काम करण्यातला आनंद वेगळा होता. तुमचा करारी बाणा, स्पष्टवक्तेपणा त्याचबरोबर तुमच्यातली ममता, सर्वसामान्यांप्रती असलेली कळकळ जवळून पाहता आली. तुम्ही एक आदर्श नेतृत्व आहात.
– मुक्ता टिळक, महापौर, पुणे


देशाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला. देश आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाला पारखे झालो आहोत. दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि गेल्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून त्यांनी धडाडीने काम केले. मोठ्या आजारावर मात करून देशासाठी त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले. त्यांची लढाऊ वृत्ती त्यांनी सतत दाखवली. काश्‍मीर प्रश्‍नावर पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी काढलेली खरडपट्टी मला आजही आठवते. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– गिरीश बापट, खासदार, पुणे


सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त धक्‍कादायक आहे. त्या आमच्या मार्गदर्शक होत्या. माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली आहे. त्यांच्या जाण्याने प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रेरणास्तंभ निखळला आहे.
– अनिल शिरोळे, माजी खासदार, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)