झाडे पाडण्यासाठी शक्कल लढवल्याचा स्थानिकांचा आरोप
येरवड्यातील प्रकार : सूचना देऊनही अधिकारी, ठेकेदाराचे दुर्लक्ष
येरवडा – प्रादेशिक मनोरुग्णालयासमोर वडाची अनेक जुनी झाडे आहेत. पण, झाडांच्या बुंध्याजवळ मातीचे ढिगारे आणि खडी टाकून ही झाडे पाडायचीच, असा चंग येथे काम करणाऱ्या ठेकेदारांनी केल्याचे चित्र आहे. मनोरुग्णालयाच्या सीमाभिंतीचे काम सध्या सुरू आहे. या खोदलेल्या खड्ड्याची माती पदपथावर आणि या झाडाच्या सभोवताली टाकण्यात आली आहे. या झाडांना धोका पोहोचण्याआधी हा राडारोडा काढण्याची मागणी होत आहे.
या रस्त्यावर वड, पिंपळाची अनेक झाडे आहेत. यामुळे या रस्त्यावर कायम सावली असते. पोस्ट ऑफिस ते मेंटल कॉर्नर रस्त्यावर 50 ते 60 झाडे आहेत. यंदा पावसाळ्यात जेलसमोरील दोन जुनी झाडे पडली. या झाडांभोवती पेव्हर ब्लॉक लावल्याने या झाडांच्या मुळांना धोका पोहोचून ती उन्मळून पडली.
सिमेंट रस्ते आणि पदपथाचे काम करताना या झाडांभोवती राडारोडा टाकल्यामुळेच ही झाडे पडली. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य धनंजय जाधव यांना या प्रकाराची कल्पना दिली असता, त्यांनी उद्यान विभाग वृक्ष निरीक्षक राजेश चिवे यांना फोन करून संबधित ठेकेदाराला नोटीस देत हा राडारोडा त्वरित हटवण्यास सांगितले.
मात्र, अधिकाऱ्याने फोनकडे दुर्लक्ष केले असून हा राडारोडा अजनूही कायम आहे. वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी कळवूनही अधिकारी दुर्लक्ष करत असतील, तर सामान्य नागरिकाने तक्रार केल्यास त्याचे निवारण कसे होत असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.
झाडाभोवतीचा राडारोडा काढून संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यास सांगितले आहे. तसेच या रस्त्यावर अनेक देशी वृक्ष असून ती संरक्षित राहावीत, यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
– धनंजय जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य
येरवडा मनोरुग्णालय परिसरातील जागेची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली जाईल. झाडांभोवती टाकण्यात आलेला राडारोडा काढून टाकण्यात येईल.
– राजेश चिवे, वृक्ष निरीक्षक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय