पुणे  – आईचे यकृतदान; मुलाला जीवदान

कठीण शस्त्रक्रिया करताना डॉक्‍टरांचे कौशल्य पणाला

पुणे  – बदलती जीवनशैली आणि अनुवंशिकतेमुळे लहान वयातच मुलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यात अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचे यकृत निकामी झाल्यामुळे एका कुटुंबाला मोठा धक्का बसला. या मुलाचे यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे डॉक्‍टरांच्या टीमने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली.

आठ वर्षीय अनिरुद्ध (नाव बदललेले) याला बिलिअरी एस्ट्राशिया (Biliary Atresia) झाल्यामुळे त्याची बिलिअरी ट्यूब अरुंद होऊन त्याचे यकृत निकामी झाले होते. परिणामी, त्याला दैनंदिन कार्य करण्यात अडचणी येत असल्यामुळे त्याच्यावर पुणे आणि औरंगाबाद येथील रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अडचणीची असून, उपचारामुळे सर्व पैसेही खर्च झाले होते. मात्र, ज्यावेळी अनिरुद्धचे यकृत प्रत्यारोपण आणि त्यावर होणाऱ्या खर्चाविषयी समजले. त्यावेळी कुटुंबीयांसमोर मोठा आर्थिक प्रश्‍न उभा राहिला. परंतू, डॉक्‍टरांचा सल्ला आणि दानशूर व्यक्तीमुळे अनिरुद्ध याच्यावर डॉ. गौरव चौबळ आणि टीमने यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

डॉ. गौरव चौबळ म्हणाले, अनिरुद्धच्या आईने यकृत दान केले असून, दोघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण ही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि त्यात अनिरुद्धची यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करणे कठीण होते. यावेळी डॉ. शरण नरुटे, डॉ. पारिजात गुप्ते, डॉ. वैशाली, डॉ. पवन हंचनाळे, डॉ. आदित्य नानावटी, डॉ. सागर कक्कड आणि डॉ सेजल गराडे या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी यकृत प्रत्यारोपण केले. त्यासाठी फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजच्या रितू छाब्रिया यांनी आर्थिक मदत केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.