Pune : पुण्यात गेल्या पाच वर्षांत विहिरीतून १०० हून अधिक वन्य प्राण्यांची सुटका

पुणे : उच्च तापमानाची सुरुवात आणि वनक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने वन्य प्राण्यांना जंगलाबाहेर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. प्राणी अनेकदा उघड्या, कठडा नसलेल्या विहिरीत पडतात, गेल्या पाच वर्षांत १०० हून अधिक वन्य प्राण्यांची सुटका वनविभागाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२२ पासून पुणे जिल्ह्यात विहिरीतून किमान ११० वन्यप्राण्यांची सुटका करण्यात आली आहे, त्यापैकी २०२४ मध्ये सर्वाधिक ५३ वन्य प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे.
हिवाळा आणि उन्हाळ्यात विहिरीत वन्य प्राण्यांच्या पडण्याच्या घटना सामान्य आहेत, कारण हे प्राणी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडू लागतात. बहुतेक वेळा हे प्राणी शेतात आणि कधीकधी गावांच्या निवासी भागात प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी फिरताना हे प्राणी भूभागाचा अंदाज घेताना चुकून विहिरीत पडतात. अशा घटना टाळण्यासाठी, वन विभागाने विहिरीला भिंत बांधून त्यांना सुरक्षित जाळ्याने झाकण्याची कल्पना मांडली आहे. त्यासाठी सरकारने आर्थिक मदतही केली आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत, अभयारण्यातील गावांमधील विहिरी मालकांना निधी दिला जातो. आवश्यकतांवर आधारित दोन तरतुदी आहेत एक म्हणजे १०० टक्के निधी देणे आणि दुसरी ७५/२५ भागीदारी तरतूद ज्यामध्ये ७५ टक्के रक्कम सरकारकडून घेतली जाते आणि उर्वरित २५ टक्के रक्कम लाभार्थ्याने भरावी लागते. जरी ही योजना प्रामुख्याने अभयारण्यातील गावांसाठी असली तरी, जर गरज असेल आणि वन्यजीवांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात असेल, तर अभयारण्याभोवतीच्या शेती क्षेत्रांनाही अशीच योजना लागू आहे, अशी माहिती पुणे वनविभागाचे सहाय्यक वन संरक्षक दीपक पवार यांनी दिली.
अशा घटना टाळण्यासाठी विभागाने अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. बारमाही पाण्याचे स्त्रोत असलेली १०० ठिकाणे शोधली आहेत. याठिकाणी वन्यप्राणी असतातच. विषबाधा, फोटो काढणे, अनावश्यक मानवी हस्तक्षेप आणि तलाव, विहीर, लहान पाण्याचे झरे इत्यादी जलाशयांमध्ये वन्य प्राणी पडणे यासारख्या कोणत्याही दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत आणि या ठिकाणांवर वेळोवेळी देखरेख ठेवली जाते, जेणेकरून अशा कोणत्याही दुर्घटना टाळता येतील किंवा वेळेवर मदत पुरवली जाईल, असे पवार म्हणाले. यावर्षी, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने पुणे जिल्ह्यातील १,९२० वन्य प्राण्यांना वाचवले आहे. यामध्ये सुमारे १,५८३ पक्षी, २३४ सस्तन प्राणी आणि १०३ सरपटणारे प्राणी होते.




