Mohan Bhagwat Remark On Ram Mandir : राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून लगेच कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. तसेच, राज्यघटनेचे आचरण होणे महत्त्वाचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ‘धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती होणे योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी लगेच हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
पुढील 20 वर्षात भारत विश्वगुरूपदापर्यंत पोहोचले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोहन भागवत म्हणाले की, विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास ‘विश्वगुरू भारत’ ही केवळ घोषणा किंवा स्वप्न राहणार नाही .
देशाने निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार आचरण होणे गरजेचे आहे. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचारण केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, यापूर्वी मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद वादावर देखील भूमिका मांडली होती. ज्ञानवापी प्रकरणावर भाष्य करताना प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? भांडण का वाढवायचे?, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते.