पुणे – मोदींनी भाजपची ब्रॅंड व्हॅल्यू घालवली – मोहन जोशी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे नुकसान तर केलेच परंतु भाजपची ब्रॅण्ड व्हॅल्यू देखील घालवली, अशा शब्दांत आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी शुक्रवारी टीका केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या लोकशाहीची बूज असलेल्या नेत्यांमुळे भाजपला देशाच्या राजकारणात विशिष्ट स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद असले तरी भाजप हा भारतीय राजकारणाचा एकेकाळचा महत्त्वाचा राजकीय पक्ष होता. पण या पक्षावर आता नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडगोळीने एकहाती वर्चस्व प्राप्त करून भाजपच्या सर्व जुन्या जाणत्या नेत्यांना अपमानित करून दूर लोटले आहे. गेल्या पाच वर्षांच्या भ्रष्ट आणि नतद्रष्ट राजकारणातून त्यांनी भाजपची अब्रू घालवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरे भाजप प्रेमी मोदींनाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही जोशी म्हणाले.

पर्वती विधानसभा मतदार संघात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी ऍड. अभय छाजेड, बंडू नलावडे, सचिन तावरे आदी सहभागी झाले होते.

कॅन्टोन्मेंटमध्ये यंदा कॉंग्रेसच्या मताधिक्‍याचा विक्रम अपेक्षित
देशातली अभूतपूर्व परिस्थिती आणि मोदी सरकारकडून झालेला भ्रमनिरास पाहता कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नागरिक कॉंग्रेसला भरीव मतदान करतील आणि कॉंग्रेसच्या मताधिक्‍यचा नवा विक्रम यंदा नोंदवतील, असा विश्‍वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील प्रचार रॅलीच्या समारोपानंतर ते बोलत होते. कॅन्टोन्मेंटचा जुनाट कायदा कॉंग्रेस पक्षानेच संसदेत बदलून घेतला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या विकासाला वेग आला. या मतदार संघाचे आणि कॉंग्रेसचे भावनिक नाते आहे. त्याची प्रचिती या निवडणुकीत पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही, असे जोशी म्हणाले.

मोदी फक्त घोषणा करतात : पाटील
मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात त्याउलट राहुल गांधी घोषणा करतात आणि त्या पूर्णही करतात, असे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले. कॉंग्रेसची खरी ताकद सर्वसामान्य जनता आहे. कॉंग्रेस पक्ष हा गुणवत्तेवर चालतो आणि ती गुणवत्ता म्हणजे घरेलू कामगार महिला आहे. राहुल गांधींनी तुमच्यासाठी महिना सहा हजार रुपये उत्पन्नाची हमी देणारी “न्याय’ योजना जाहीर केली आहे. त्यामुळे “न्याय’ योजना अंमलात आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणे आवश्‍यक असल्याचे पाटील म्हणाले. राष्ट्रीय मजदूर संघ आणि पुणे शहर असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने घरेलू कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, पुणे शहर असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष एस.के. पळसे, सीताराम चव्हाण उपस्थित होते. देशात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार आले तर युतीच्या सरकारने घरेलू कामगारांसाठी बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू करू, असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.