पुणे – महापालिका बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांची पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. थेट आमदारांनी तक्रार केल्याने महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.
“पुरंदर-हवेली मतदारसंघांत पुण्याच्या उत्तर भागातील दत्तनगर, आंबेगाव, कात्रजच्या काही भागांचा समावेश होतो. महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.
पण, कारवाईवेळी काही अधिकारी ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हीत जोपासत आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बांधलेल्या व गोरगरिबांनी खरेदी केलेल्या इमारतींवरच अधिकारी कारवाई करत आहेत.
मात्र, हात ओले करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर हे अधिकारी कारवाई करत नाहीत’, असा आमदार जगताप यांचा आरोप आहे. “अनधिकृत बांधकाम सुरू होतानाच कारवाई केल्यास गोरगरिबांना बेघर होण्याची वेळ येणार नाही. काही काळानंतर महापालिकेचा बांधकाम विभाग या बांधकामावर कारवाई करत आहे.
या धोरणामुळे मध्यमवर्गीय व गोरगरिबांना बेघर होण्याची वेळ येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता व उपअभियंता भ्रष्ट पद्धतीने कामकाज करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी आमदार जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या अधिवेशनामध्ये याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे.