पुणे –करोनामुळे आर्थिक उत्पन्न घटल्याचे कारण देत शहरातील विकासकामांवर खर्च करण्यास आखडता हात घेणाऱ्या प्रशासनाकडून महापालिका प्रशासनाकडून दररोज लाखोंच्या महसुलावर पाणी सोडण्यात येत आहे. शहरात एक किंवा त्यापेक्षा जास्त जाहिरात फलक, बोर्ड बॅनर्स लावल्यास 1 हजार ते 5 हजारांपर्यंतचा दंड संबंधित जाहिरातदाराकडून वसूल करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला प्रभागरचना जाहीर होताच शहरात हजारो अनधिकृत बोर्ड आणि फ्लेक्स लागले आहेत. त्यामुळे या जाहिरातबाजांवर दंड आकारल्यास पालिकेस दिवसाला लाखो रुपयांचा महसूल मिळणार असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने हे नुकसान कोणाकडून वसूल
करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काय आहेत आयुक्तांचे आदेश
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स, झेंडे याच्या निष्कासन खर्च वसूल व दंड आकारणीबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच आकाशचिन्ह विभागास मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात, शहरात 1 ते 10 पर्यंत बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्स लावलेले असल्यास कमीत कमी 1 हजार रुपये दंड आकारणे तसेच त्यापेक्षा जास्तीत जास्त 5 हजार दंड वसूल करणे असे आदेश दिलेले आहेत.
राजकीय नेत्यांना अभय का?
महापालिकेडून शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी एक दिवस उशिरा मिळकतकर भरल तरी त्यांच्याकडून महिन्याला मिळकतकरावर 2 टक्के दंड आकारला जातो. तसेच सर्वसामान्यांकडून साध्या साध्या कारणांसाठी नोटीस देऊन कारवाई केली जाते. मात्र, त्याचवेळी पालिकेची परवानगी न घेता शहर विद्रूप करणाऱ्या तसेच आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिलेले असतानाही राजकीय नेत्यांना अभय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.