पुणे – पथारी व्यावसायिकांचे त्याच परिसरात स्थलांतर

पुणे – स्वारगेट येथील महामेट्रोच्या ट्रान्सपोर्ट हबच्या कामासाठी या भागात असलेल्या पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर अखेर निश्‍चित झाले आहे. लक्ष्मी नारायण सिनेमागृहासमोरील महापालिकेचे पदपथ आणि पाटील प्लाझाच्या परिसरात या सुमारे 108 व्यावसायिकांचे स्थलांतर पुढील आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, व्यावसायिकांची मागणी असली तरी ड्रेनेज तसेच वीज जोडणीची कोणतीही व्यवस्था पालिका देणार नसल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या स्थलांतरणावरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

महामेट्रोकडून स्वारगेट येथे मल्टीमॉडेल हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा रस्त्यापासूनच्या सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले सुमारे 108 स्टॉल स्थलांतरीत करावे लागणार आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप अतिक्रमण विभागाकडून कोणतीही जागा निश्‍चित करण्यात आलेली नव्हती. त्यातच मेट्रोकडून वारंवार ही जागा देण्याबाबत पालिकेकडे तगादा लावण्यात आला आहे. अखेर महापालिका प्रशासनाने हे स्टॉल हलविण्याचा निर्णय घेतला असून लक्ष्मी नारायन सिनेमा गृहाच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर असलेल्या पदपथावर काही स्टॉल, तर सारसबागेच्या बाजूला आणि पाटील प्लाझाच्या समोरील महापालिकेच्या पदपथांवर हे स्टॉल स्थलांतरीत केले जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.