पिरंगुट -उरवडे (ता. मुळशी) येथील कंपनीला लागलेली आग नियंत्रणात असली तरी मंगळवारी (दि. 8) सकाळी काही भागात आग धुमसत होती. दरम्यान, यात मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे कंपनीकडून देण्यात आली आहेत.
कंपनीची इमारत आगीत जळून भस्मसात झाली असून घटनेच्या दुसऱ्या दिवशीही काही भागात आग धुमसत आहे. या कंपनीमध्ये जवळपास 37 जण कार्यरत होते. त्यापैकी 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. इतर 19 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.
तर धुमसणारी आग आटोक्यात आणण्यासाठी एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुखही घटनास्थळी पोहोचले.
कंपनीतील पॅकिंग विभागात ही आग लागली होती, बंदिस्त खोलीत आग लागल्यामुळे कुणालाही बाहेर पडता आले नाही. याठिकाणी आर एम वन पावडर हा ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आग भडकली असण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करत आहेत.