पुणे – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी गणपा यांनी हा आदेश दिला आहे.
निकुंज शहा ( वय 39 रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेल्या भाव केयर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा ( वय 68 रा .सहकारनगर) या दोघांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. 8 जून रोजी एस.व्ही अकवा कंपनीला आग लागून त्यात 17 कामगारांचा होळपळून मृत्यू झाला आणि 5 कामगार गंभीर जखमी झाले.
या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियनाचे पालन न केल्यास तसेच अनाधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या मालकाला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, या प्रकरणातील अन्य दोन आरोपीला अटक करायचे असल्याने आणि पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. बचाव पक्षाच्य वतीने अॅड हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.