पुणे मेट्रोचा “दुसरा गिअर’

पिंपरी-फुगेवाडी मार्गावर चाचणी यशस्वी

पुणे – मेट्रोच्या कामाने वेग घेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि.3) पार पडला आहे. पिंपरी-चिंचवड (पीसीएमसी) ते स्वारगेट या मार्गिकेवरील चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः 6 किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.

करोनामुळे 6 ते 7 महिने मेट्रोसंबंधित कामाचा वेगाला ब्रेक लागला होता. पण, अनलॉकनंतर हे काम वेगाने सुरू झाले. यापूर्वी दि. 10 जानेवारी 2020 रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या 1 कि.मी. मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (दि.3) बरोबर वर्षभराने ही दुसरी चाचणी घेण्यात आली.

दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मेट्रो ट्रेन पीसीएमसी स्थानकावरून सुटली व दुपारी दोन वाजता फुगेवाडी या स्थानकावर पोहोचली. या चाचणीसाठी कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम केले. चेतन फडके यांनी ट्रेन चालवली.

या चाचणीसाठी ओएचई (जकए) तारा 25 के.व्ही विद्युतभाराने सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रभावित केल्या होत्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच 6 कि.मी. रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षण अशा अनेक बाबींची पूर्तता करून आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. या चाचणीसाठी 3 कोचची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित
यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.