साडेचार किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण
पुणे – पुढील काही महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत धावणाऱ्या महामेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गांतील सुमारे साडेचार किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर पुढील दोन दिवसांत रूळ टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पात अतिरिक्त असलेले रूळ पुण्याकडे रवाना करण्यात आले असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. पुणे मेट्रोसाठी तयार करण्यात येणारे रूळ येण्यास उशीर होणार असल्याने वेळेची बचत करण्यासाठी नागपूरचे अतिरिक्त रूळ आणण्यात येत असून उद्या (शुक्रवारी) दुपारी ते पिंपरी-चिंचवडला खराळवाडी मार्गाच्या ठिकाणी पोहोचणार असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.
असे आहेत हे अत्याधुनिक रूळ
पुणे मेट्रोसाठी युआयसी 60 ई 1, 1080 ग्रेड, हेड हार्डन या प्रकारचे रेल्वे रूळ वापरणार आहे. जगभरातल्या अत्याधुनिक रेल्वे प्रणाली याच प्रकारचे रेल्वे रूळ वापरत आहेत. महामेट्रोसाठी रेल्वे रूळ 18 मी व 25 मी या लांबीमध्ये वापरण्यात येणार आहे. हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट व अल्युमिना थर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहे. अशा जोडलेल्या रेल्वे रूळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. या रेलचा वरचा भाग (हेड) हा विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे कठीण (हार्ड) केलेला असेल त्यामुळे या रुळाची झीज कमी होईल व त्यामुळे रुळांचे आयुष्य वाढेल व रूळ बदलण्याची लवकर आवश्यकता पडणार नाही.
पुणे मेट्रोसाठी लागणार 9 हजार रूळ
या प्रकल्पासाठी एकूण 9 हजार एमटी रुळांची आवश्यकता आहे. पुढील वर्षी सुरू करण्यात येणाऱ्या या दोन्ही मार्गांसाठी एकूण 3000 एमटी रूळ लागणार आहेत. नागपूरहून 600 एमटी रूळ पुण्यासाठी सध्या येणार आहेत. हे रूळ इस्ट मेटल एजी या स्वित्झर्लंडच्या कंपनीने त्यांच्या सायबेरियातील कारखान्यात बनविण्यात आले आहेत.