पुढच्या 7 महिन्यांत धावणार पुणे मेट्रो

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्ग प्रगतीपथावर


तीन पैकी दोन ठिकाणची कामे 50 टक्‍क्‍यांच्या आसपास पूर्ण

पुणे – पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो धावणार असल्याचा दावा “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत “महामेट्रो’चे प्रकल्प प्रमुख प्रशांत कुलकर्णी, वाघमारे आणि गौतम बिराडे यांनी ही माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या एलिव्हेटेड (उन्नत) मेट्रोचे काम सुमारे 45 टक्के पूर्ण झाले आहे. उरलेले काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून, तीन टप्प्यातील मिळून सुमारे 31 टक्के काम पूर्ण आले आहे. त्यातील दोन टप्पे हे 50 टक्‍क्‍यांच्या जवळपास पोहोचले असून, तिसरा जिल्हा न्यायालय ते रामवाडी या टप्प्याचे काम आता सुरू झाले आहे.

एकूणच या मार्गावर एकून नऊ स्टेशन्स आहेत. त्यातील सहा पिंपरी-चिंचवड हद्दीत तर तीन पुणे महापालिका हद्दीत आहेत. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या सात किमी मार्गावर फुगेवाडी आणि संत तुकाराम नगर असे मुख्य स्टेशन्स असणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय हा पाच किमीचा मेट्रो मार्ग आहे. येथे आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय असे दोन स्टेशन्स आहेत. हा मार्गही डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचा प्रयोग नोव्हेंबरच्या अखेरीस होण्याची शक्‍यता आहे. मेट्रोच्या डब्यांसाठीच्या निविदा लवकरच निघतील असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही मार्गातील फाउंडेशन, पिलर, पिलर कॅब, सेगमेन्ट कास्टिंग, स्पॅन लॉंचिंग ही कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत.

पंतप्रधानांनी दिले आहे वेळेचे “टार्गेट’
मेट्रोचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी दिलेले 2019 चे “टार्गेट’ पूर्ण करण्याचा प्रयत्न “महामेट्रो’कडून सुरू आहे. मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी सुरू केलेल्या कामांचा आढावा ते नक्‍की घेतील. त्यामुळे ते “टार्गेट’ वेळेत पूर्ण करण्यासाठी जलदगतीने हे काम पूर्ण करून, येत्या डिसेंबरपर्यंत गरवारे महाविद्यालयापर्यंततरी मेट्रो आणण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.