पुणे –महामेट्रोकडून मुठा नदीपात्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते कॉंग्रेसभवनपर्यंतचे नदीपात्रातील व्हायडक्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर आता या 1.6 किलोमीटरच्या मार्गातील दोन स्टेशनचे काम वेगाने सुरू असून जुलै अखेरपर्यंत महापालिका भवन आणि पुढे सिव्हील कोर्टपर्यंत जुलै 2022 अखेर मेट्रोची सेवा सुरू करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले असल्याची माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. या नदीपात्रातील कामाची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. या मार्गात डेक्कन आणि बालगंधर्व रंगमंदीर ही दोन स्टेशन असून पावसाळ्यापूर्वी या स्टेशनचे कामही पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे..
महामेट्रोकडून 6 मार्चपासून शहरात मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालयापर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात गरवारे ते सिव्हील कोर्ट या मार्गास प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गात डेक्कन, बालगंधर्व रंगमंदीर आणि महापालिका भवन ही तीन स्टेशन असणार असून पुढे सिव्हील कोर्ट येथे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गाचे इंटरचेंज स्टेशन असणार आहे. त्यामुळे महामेट्रोकडून आता वनाज ते सिव्हील कोर्टपर्यंतचा मार्ग प्राधान्य क्रमाणे पूर्ण केला जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या मार्गामुळे नागरिकांना महापालिकेपासून ते थेट वनाजपर्यंत मेट्रोचा वापर करता येणार आहे. तसेच, या मार्गातील तीनही स्थानकांचे कामही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
दोन स्थानकांमध्ये पादचारी पूल
नदीपात्रात असलेल्या डेक्कन ते बालगंर्धव रंगमंदीर या दोन स्थानकांच्या मध्ये मेट्रो मार्गाच्या खालील बाजूस महामेट्रोकडून पादचारीपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे, या पुलावरून नागरिकांना पावसाळ्यात मुठा नदी वरून पाहता येणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच हा पूल असणार असून अशाप्रकाराचा पादचारीपूल नागपूर येथे साकारण्यात आला आहे. याशिवाय, बालगंधर्व स्थानकाकडे जाण्यासाठी नारायण पेठेतील धोबीघाट येथूनही पादचारी पूल करण्यात येणार असून या पूलाचे नदीपात्रातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे.