Pune Metro : शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि स्वारगेट ते सासवड पर्यंत मेट्रो मार्गांचा होणार विस्तार

हडपसर मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

हडपसर (विवेकानंद काटमोरे) – शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करावा. तसेच स्वारगेट ते हडपसर असा मेट्रो मार्ग करण्याची मागणी गतवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली होती.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आणि शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

आता नव्याने या मार्गांना जोडून स्वारगेट ते सासवड मेट्रो या मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे. मेट्रो हडपसरमधून सासवडपर्यंत नेण्यात यावी यासंदर्भातही अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावाही मागील वर्षी केला होता असा दावाही आमदार चेतन तुपे पाटील यांनी केला आहे .तर या दोन्हीं मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. या मेट्रो संदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता,असे आमदार तुपे यांनी सांगितले.

“वचननाम्यात दिलेल्या वचनानुसार वचनपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. हडपसर भागात होणारी वाहतूककोंडीची समस्या देखील यामुळे सुटणार आहे. डीपीआर तयार केल्यानंतर मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे. मेट्रो उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून हडपसरच्या विकासात मेट्रोचे महत्वपूर्ण योगदान ठरणार आहे. या मेट्रोच्या कामांसाठी केंद्र व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे.” – चेतन तुपे पाटील (आमदार, हडपसर विधानसभा मतदार संघ)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.