पुणे – स्वारगेट येथील मेट्रो हबच्या कामासाठी राजर्षि शाहू महाराज बसस्थानकातील पार्किंग महामेट्रोकडे हस्तांतरित केले जाणार आहे. त्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी महापालिकेने महामेट्रोकडे केली असून हे पार्किंग पूर्णत: काढले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. महामेट्रो आणि महापालिकेच्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.
महामेट्रोकडून स्वारगेट येथे मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खोदाई सुरू असून लवकरच भुयारी मार्गाचेही काम केले जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी असलेल्या पीएमपी बसस्थानकाचे नुकतेच स्थलांतर करण्यात आले असून आता महामेट्रोकडून या ठिकाणच्या पार्किंगच्या जागेची मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र, महापालिकेकडून या ठिकाणचे वाहनतळ ठेकेदारास चालविण्यास दिले असून त्याचा करार पुढील वर्षी संपत आहे. हे पार्किंग महामेट्रोला दिल्यास त्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार असल्याने या पार्किंगच्या मोबदल्यात 15 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यावर या दोन्ही विभागात प्राथमिक चर्चा झाली असून महामेट्रोने ही रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, लवकरच ही जागा महामेट्रोच्या ताब्यात दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.