पुणे – मेट्रो विस्तारही “ट्रॅक’वर

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाला मान्यता


1,048 कोटींचा खर्च शासनाकडून मंजूर

पुणे – पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोच्या विस्तारित मार्गास राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली आहे. सुमारे साडेचार किलोमीटरच्या लांबीच्या या मार्गास सुमारे 1 हजार 48 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा सर्व मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे.

स्वारगेट-पिंपरी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गाच्या विस्तारिकरणाची मागणी वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार महामेट्रोने या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता.

महामेट्रोकडून पीसीएमसी ते स्वारगेट (16.5 कि.मी) मेट्रो काम सुरू आहे. त्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर डिसेंबर 2019 अखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. मात्र, त्याच वेळी नागरिकांकडून या मार्गाचे विस्तारिकरण करण्याची मागणी केली जात होती. तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरण (पीएमआरडीए)यांनी तयार केलेल्या वाहतुकीच्या सर्वंकष आराखड्यात सद्यस्थितीत मेट्रो मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी महामेट्रोने M/s. SYSTRA-AECOM-EGIS-RITES (कर्न्सोटियम) यांचाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून घेतला होता. त्यानंतर या आराखड्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिलेली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनास पाठविला होता. त्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे.

असा आहे मार्ग
– विस्तारित मार्ग- 4.423 किमी
– स्थानकांची संख्या – 3
– चिंचवड, आकुर्डी, निगडी स्थानक
– एकूण खर्च – 1 हजार 48 कोटी रु.

अशी असेल निधीची उभारणी (रुपयांत)
सॉफ्ट लोन – 518 कोटी
केंद्र सरकार -122 कोटी
पिंपरी-चिंचवड महापालिका – 122 कोटी
जमीन प्रभाग मूल्यांकन – 185 कोटी
राज्य कर हिस्सा – 51 कोटी
केंद्र कर हिस्सा – 51 कोटी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here