पुणे – लस घेतली नसताना लसीकरण झाल्याचा मेसेज

ज्येष्ठ नागरिक बुचकळ्यात; तांत्रिक बिघाडाचे दिले कारण

पुणे -रजिस्ट्रेशन झाले असताना लस मिळाली नाहीच.., त्यातही वाट पाहून, काही तास घालवून रिकाम्या हाताने परत आल्यावर लसीकरण झाल्याचा मेसेज आला तर किती संताप होईल. याचा विचार न केलेलाच बरा. एका ज्येष्ठ नागरिकाबरोबर हा प्रकार गुरुवारी घडला. तांत्रिक बिघाडामुळे असे झाल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

अतुल भिडे यांनी त्यांचे 88 वर्षीय वडील आणि 86 वर्षीय आई तसेच 88 वर्षीय सासरे यांच्यासाठी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट नऱ्हे सिंहगड कॉलेज येथे 30 एप्रिलला सकाळी 11 ते 1 या स्लॉटमध्ये मिळाली. भिडे हे तिघांनाही घेऊन पावणे अकरा वाजता केंद्रावर पोहोचले तेव्हा तेथे प्रचंड गर्दी होती. तेथील अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट पत्रही दाखवले. ज्येष्ठ नागरिक असल्याचेही सांगितले; परंतु केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, तुम्हाला रांगेतच यावे लागेल वेगळी सोय नाही.

रांगेतील लोक सकाळी सहापासून उभे आहेत. नाईलाजास्तव भिडे हे रांगेत उभे राहिले; परंतु, थोड्याच वेळात लस संपल्याचे जाहीर करण्यात आले; त्यामुळे भिडे तिघांना घेऊन घरी आले.

अतुल भिडे यांनी घरी येऊन कोविनऍप उघडून पाहिले तेव्हा असे दिसले की, या तीनही लोकांच्या नावावर लस दिल्याचा दाखला दिसत होता. त्यामुळे ते चक्रावलेच, असे झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे दुसरी अपॉइंटमेंट घेता येणे शक्‍यच झाले नाही. याबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क केला असता, तांत्रिक बिघाडामुळे हे झाल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.